Asia Cup 2025 भारताच्या एशिया कप मोहिमेला सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागल्याने संघाची चिंता वाढली आहे. एशिया कप २०२५ साठी निवड झालेल्या १५ सदस्यीय भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) सुरू होणार असून त्यापूर्वीच त्याच्या दुखापतीची बातमी समोर आल्याने त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
संजू सॅमसनची पत्नी चारुलता रमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात संजू सॅमसन २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रुग्णालयात होता असे म्हटले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. विशेष म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग (KCL) २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसला. या सामन्यात त्याचा संघ कोची ब्लू टायगर्सने अदानी त्रिवेंद्रम रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात संजूला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण तो मैदानावर उपस्थित होता.
रुग्णालयात का दाखल व्हावे लागले?
संजू सॅमसनला रुग्णालयात का दाखल करण्यात आले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर ते भारतीय संघ आणि निवड समितीसाठी मोठा चिंतेचा विषय ठरू शकते. एशिया कपच्या तयारीसाठी खेळाडूंची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असते आणि अशा परिस्थितीत संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूला रुग्णालयात दाखल करावे लागल्याने टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या संजू केरळ क्रिकेट लीगमध्ये कोची ब्लू टायगर्सचे नेतृत्व करत आहे. त्याची मैदानावरची उपस्थिती हे दर्शवते की त्याची दुखापत कदाचित गंभीर नसावी. मात्र, त्याच्या आरोग्याबद्दलची अनिश्चितता कायम आहे.

Asia Cup 2025 संजू सॅमसनची फॉर्म
रुग्णालयात दाखल होण्याच्या काही दिवस आधी संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवून दिले होते. त्याने ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात केसीए सेक्रेटरी इलेव्हनला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केसीए प्रेसिडेंट इलेव्हनने २० षटकांत ८ बाद १८४ धावा केल्या होत्या. यात रोहन कुन्नुमलने २९ चेंडूत ६० धावा आणि अभिजीत प्रवीणने १८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली होती. सेक्रेटरी इलेव्हनकडून शराफुद्दीनने ३ तर सिजोमन जोसेफने २ बळी घेतले होते.
संजू सॅमसनची सामना जिंकणारी खेळी
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेक्रेटरी इलेव्हनने १९.४ षटकांत ९ बाद १८८ धावा करून सामना जिंकला. या विजयात यष्टिरक्षक विष्णू विनोदची २९ चेंडूंतील ६९ धावांची वादळी खेळी आणि कर्णधार संजू सॅमसनची ३६ चेंडूंतील ५४ धावांची संतुलित खेळी निर्णायक ठरली. शेवटी बासिल थम्पीने शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
संजू सॅमसनची ही शानदार फॉर्म भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची होती. पण आता त्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमध्ये तो पूर्णपणे फिट असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) किंवा संजू सॅमसनने स्वतः याबाबत अधिकृत माहिती दिल्यावरच परिस्थिती स्पष्ट होईल. चाहते आणि संघ व्यवस्थापन दोघांनाही संजू सॅमसनच्या तब्येतीबद्दलच्या अपडेटची प्रतीक्षा आहे.